breaking-newsमहाराष्ट्र

भाजप-शिवसेनेचे सरकार नाकर्ते: अशोक चव्हाण

  • जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद, गावोगावी जंगी स्वागत

बहुतांशी शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत
यावेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सरकारने 34 हजार कोटांची कर्जमाफी जाहीर केली. आतापर्यंत फक्त 14 हजार कोटीच मिळाले आहेत. बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. या भागातील डाळिंब उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतक-यांना सरकारकडून मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हे सरकार निर्णय घेताना आणि कायदे करताना विचार करत नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास दंड व तुरुंगवासाची शिक्षा करण्याचा कायदा शेतक-यांच्या हिताचा नाही तर शेतक-यांना देशोधडीला लावणारा आहे.

सांगली- राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार नाकर्ते असून या सरकारने जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी चिघळवत ठेवून नवीन प्रश्न निर्माण केले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते जत येथे जनसंघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते.

कॉंग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या दिवसाची सुरुवात सांगली येथे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून झाली. त्यानंतर जनसंघर्ष यात्रा जतकडे रवाना झाली. रस्त्यात ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे यात्रेचे स्वागत केले. जत येथे सभेला संबोधित करताना खासदार अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

चव्हाण म्हणाले, नाकर्त्या भाजप-शिवसेना सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सत्ता आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊ असे आश्वासन फडणवीसांनी दिले होते. साडेतीन वर्ष झाले शेकडो कॅबिनेट झाल्या पण अद्याप आरक्षण दिले नाही. धनगर बांधव विचारतायेत “क्‍या हुआ तेरा वादा?’. कर्जमाफीची घोषणा करून दोन वर्षे झाली अद्याप शेतक-यांना पैसे मिळाले नाहीत.

शेतीमालाला भाव नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत. सुशिक्षित तरूणांना रोजगार नाही. सरकार मराठा व मुस्लीम आरक्षणाच्या निर्णयाबाबत चालढकल करून जाणिवपूर्वक हा प्रश्न चिघळवला जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करण्याचेच काम सरकार करत आहे. या सरकारला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

जत येथून पलूस कडेगावकडे जाताना कुंभारी येथे संघर्ष यात्रेत सहभागी प्रमुख नेत्यांनी रस्त्याच्या कडेला एका टपरीवर थांबून चहा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी मनमोकळा संवाद साधला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. बस्वराज पाटील, सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम यांनी या सभेला मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ. डी. पी.सावंत, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, कॉंग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे युवा नेते विशाल पाटील, सांगली शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम, विक्रम सावंत यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button