breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

भाजपने किती तरुणांना नोक-या दिल्या ते सांगावे, मग औद्योगिक पार्कची वल्गना करावी – अजित पवार  

  • सांगवीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद
  • सत्ताधारी भाजप, शिवसेना सरकारचा घेतला खरपूस समाचार

पिंपरी, (महाईन्यूज) – अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे राज्यावर साडेचार लाख कोटी कर्जाचा बोजा वाढला आहे. तरी देखील सरकार राज्यात औद्योगिक पार्क तयार करण्याची घोषणा करत आहे. मेक इन, स्कील इंडियाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये किती उद्योग सुरू केले?. किती तरुणांना नोक-या दिल्या?. या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यानंतर औद्योगिक पार्कच्या गोष्टी करा, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला सुनावले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिका-यांची आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार शहरात आले. तत्पुर्वी, सांगवीतील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे यांच्या स्वागृही पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, मयूर कलाटे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पारदर्शकतेच्या नावाखाली देशात भाजप सरकार आले. दोन कोटी तरुणांना नोकरी देणार होते. आज भाजपच्या नेत्यांनी किती तरुणांना नोक-या दिल्या हे सांगावे. त्यानंतरच औद्योगिक पार्क करण्याची गोष्ट करावी. गेल्या तीन वर्षांपासून कर्जमुक्तीची घोषणा केली जाते. हे सरकार एकाही शेतक-याचे कर्ज माफ करू शकले नाही. आता पुन्हा सरकारने 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत कर्जमाफी करण्याचे नवीन आश्वासन दिले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारने हे आश्वासन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचेच मंत्री आहेत. तरी, मुंबईतील बांद्रा येथे शिवसेनेने विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला. सत्ता तुमची, अधिकार तुमच्या हातात असताना मोर्चा काढण्याची गरजच काय आहे. विमा कंपन्यांना बोलवून घ्या, त्यांना खडसावून सांगवून तसे आदेश द्या, बघू कसा विमा मंजूर होत नाही, अशीही डरपोक्ती पवार यांनी सरकारला दिली.

उत्पादन घसरणीवर भाजप नेत्यांचा ब्र देखील निघत नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षाच्या लोकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कोण कुठला उमेदवार, कोणाला किती जागा द्यायच्या यावर आजून चर्चा झालेली नाही. सध्या सरकारच्या विरोधात सक्षम फळी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राज्यातील औद्योगिक उत्पादनाचा दर 3.1 पर्यंत घसरला आहे. यावर भाजपचे नेते ब्र देखील काढत नाहीत. तसेच, तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचं सांगितलं जातं. लोकांच्या पचनी पडेल एवढंच खोटं बालावं. किती खोटंय बोलायचं त्याला पण मर्यादा असते. मुंबईत इमारत कोसळून अनेकांचे प्राण गेले. पुण्यात भिंत कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील पवार यांनी सरकारवर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button