breaking-newsमहाराष्ट्र

पोलिसाला टिप्परने धडक देऊन चिरडलं, अवैध रेती वाहतूकदाराचा हैदोस

बुलढाणा : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने पाठलाग करणाऱ्या पोलिसाला चिरडून ठार मारल्याची घटना बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक आणि त्याच्या मालकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

लॉकडाऊनदरम्यानही बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. पूर्णा नदी किनाऱ्याला लागून असलेल्या जळगाव, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा तालुक्यातील गावांजवळ मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे वाळू माफिया दिवसाढवळ्या आणि रात्रभर चोरट्या मार्गाने अवैध रेती वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे.

शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश शिरसाठ यांना आज सकाळी माटरगाव आणि भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठातून एक विना नंबरचे टिप्पर अवैध रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने एका होमगार्डला सोबत घेतले आणि दुचाकीवरुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला.

कॉन्स्टेबल उमेश शिरसाठ यांनी भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परचा पाठलाग करत आपली दुचाकी टिप्परच्या पुढे आडवी उभी केली. मात्र, टिप्पर चालक नराधमाने गाडी न थांबवता शिरसाट यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्यांना चिरडलं. त्यामुळे शिरसाठ गंभीर जखमी झाले. टिप्पर चालक तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन शिरसाठ यांना पुन्हा चिरडलं. यात त्यांचा मृत्यू झाला. हा थरारक बघून शिरसाठ यांच्यासोबत आलेला होमगार्ड पळून गेला. तर टिप्पर चालक खामगावच्या दिशेला पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहचले. पोलीस दिवसभर टिप्परचा शोध घेत होते. या घटनेची माहिती इतर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपास मोहीम सुरु केली.

पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बेलाड, नवी येरळी परिसरात शोध मोहीम सुरु केली. यावेळी त्यांना टिप्पर आणि टिप्पर मालक सापडले. सुधाकर मिरगे असं टिप्पर मालकाचं नाव आहे. तर विशाल गवळी असं नराधम टिप्पर चालकाचं नाव आहे. या दोघांसह गोपाळ बेले, लक्ष्मण इंदोरे, श्रीकृष्ण मिरगे यांना अटक करुन त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button