breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे बोर्डाचा अजब न्याय

  • उत्तरपत्रिकेची पाने फाटलेली आढळल्याने विद्यार्थिनी एका विषयात नापास 
    – लेखी खुलासा करून देखील ठरवले जातेय दोषी

पुणे – नुकत्याच लागलेल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालानंतर बोर्डाचा एक अजब न्याय समोर आला आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाने एका विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेची पाने फाटलेली आढळल्याने चक्‍क तिला त्या विषयात शुन्य गुण दिले आहेत. ती पाने कशी फाटली याची त्या विद्यार्थिनीला कल्पना देखील नसल्याचे तिने चौकशीदरम्यान लेखी सांगितले असले तरीही बोर्डाने तिला शुन्य गुण दिले आहेत.

बोर्डाच्या म्हणण्यानुसार मी मुद्दाम पेपरची पाने फाडली आहेत असे आहे. मात्र स्वत:चेच नुकसान कोण स्वत: करेल? मला दहावीला 85 टक्‍के गुण होते. आताही मला भौतिकशास्त्रात 35 जरी मिळाले तरीही मला 59 टक्‍के गुण मिळतील. ती फाडलेली पाने वगळता उर्वरित जरी पेपर तपासला तरीही मला 35 पेक्षा अधिक गुण सहज मिळतील हे मला माहिती आहे. यासाठी मी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळावी यासाठी अर्ज करायला गेले तर तो अर्जही स्विकारला गेला नाही.
– संजना पोंगडे, विद्यार्थिनी

पुण्यातील पिंपरी येथील मराठवाडा मित्र मंडळ ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या संजना पोंगडे या विद्यार्थिनीला 8 मे रोजी विभागीय बोर्डाचे पत्र आले. त्या पत्रात तुमच्या भौतिकशास्त्र या विषयाच्या 28 पानी उत्तरपत्रिकेतील पान क्रमांक 21 व 22 ही फाटलेली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तिला बोर्डात चौकशीसाठी बोलावण्यात आले. बोर्डात चौकशीदरम्यान ही पाने मी पेपर देईपर्यंत व्यवस्थित होती, मात्र ती नंतर कशी फाटली हे मला माहिती नाही असे लेखी लिहून दिले. मात्र त्यानंतरही ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी संजनाला भौतिकशास्त्र विषयात शुन्य गुण मिळालेले दिसले. याबाबत तिने विभागीय मंडळाकडे चौकशी केली असता चौकशीदरम्यान मला चुकीची वागणूक दिली असल्याचे संजनाचे म्हणणे आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका फाटलेल्या आढळल्या आहेत त्याची चौकशी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून पेपर फाडल्याचे मान्य केले किंवा पेपरवर रेघ मारल्याचे मान्य केले त्यांना शिक्षा झालेली आहे. जे विद्यार्थी मान्यच करत नाहीत त्यांची त्या विषयाचे पेपरचे गुण न धरता त्यांना आम्ही जुलैच्या परीक्षेत पेपर देण्यास सांगितले आहे.
– तुकाराम सुपे, अध्यक्ष, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

संजना म्हणाली, मंडळाच्या उच्च पदस्थ महिला अधिकारी यांच्याकडे मी गेले असता त्यांनी सांगितले की, तुझे पेपर तूच फाडले आहेस असे मान्य कर. अन्यथा पुन्हा जुलैमध्ये होणारी परीक्षा दे. जर तू हे पेपर फाडला हे मान्य करत नसशील तर मग आम्हाला तुझ्यावर कारवाई करत तुला सात वर्षांसाठी परीक्षेपासून वंचित ठेवावे लागेल. या एकूणच प्रकारामुळे मी आता कुठे दाद मागावी हेच मला कळत नसल्याचे संजनाचे म्हणणे आहे. तर या एकूणच प्रकाराबाबत त्या महिला अधिकाऱ्याशी बोलण्याचा दैनिक “प्रभात’ने सातत्याने संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button