breaking-newsमुंबई

पाकिस्तानच्या हाती कटोरा कायम, फक्त दाता बदलला-शिवसेना

पाकिस्तानच्या हाती भीकेचा कटोरा कायम राहिला असून त्यांचा दाता फक्त बदलला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ एका वृत्तवाहिनीचा आहे. पीटीव्ही या वृत्तवाहिनीने इम्रान खान बिजिंगमध्ये बोलत असताना त्यांच्या डेटलाईनमध्ये चक्क Begging असे लिहिले आहे. इम्रान खान भाषण देत असताना जणू काही भीक मागत होते असेच या वृत्तवाहिनीला म्हणायचे आहे का? असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडला. काही सेकंदांचा हा स्क्रीनशॉट क्षणात व्हायरल झाला. हा संदर्भ घेऊन आणि पाकिस्तानचे धोरण पाहून शिवसेनेनेही पाकिस्तानवर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानच्या झोळीत चीन सहा अब्ज डॉलर्सची ‘मदत’ टाकणार आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अलीकडच्या चीन दौऱयात चीनने म्हणे तसे आश्वासन दिले आहे. या दौऱयात नेहमीप्रमाणे दोन्ही देशांदरम्यान अनेक करारमदार झाले, पण इम्रान यांची सगळी ‘मदार’ होती ती चीनकडून मिळणाऱया ‘आर्थिक पॅकेज’वर. कारण सध्या पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. तो देश एवढा कंगाल झाला आहे की पंतप्रधान निवासस्थानातील म्हशी विकून २३ लाख रुपये जमवावे लागले. त्याशिवाय ६१ सरकारी गाडय़ांचा लिलाव करून २० कोटी रुपये जमवण्यात आले. पूर्वी निदान अमेरिका हा त्यांचा सर्वात मोठा ‘आधार’ होता. दरवर्षी अमेरिका अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानच्या झोळीत ‘अर्थसहाय्य’ म्हणून ओतत असे. मात्र हा सगळाच पैसा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अवैध शस्त्रास्त्र व्यापार आणि दहशतवाद यासाठी वापरला गेला. त्यामुळे सात दशके उलटली तरी पाकिस्तान हे दरिद्री, मागासलेले राष्ट्रच राहिले.

‘दहशतवाद्यांचा कारखाना’ अशी या देशाची जगभरात ओळख झाली आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने आणि कोणत्या देशाच्या दारात आर्थिक मदतीसाठी उभे राहायचे, हा त्या देशाच्या सत्ताधाऱयांसमोर प्रश्नच होता. त्यात गेल्या काही वर्षांत अमेरिकेचेही पाकप्रेम आटत चालले होते. वर्षानुवर्षे अब्जावधी डॉलर्सचे ‘दूध’ पाजूनही हा ‘हिरवा साप’ अमेरिकेवर ‘9/11’च्या रूपाने उलटला. त्यामुळे हादरलेल्या आणि भानावर आलेल्या अमेरिकेने पाकडय़ांच्या आर्थिक नाडय़ा आवळण्यास सुरुवात केली. विद्यमान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्या देशाची आर्थिक नाकाबंदीच केली आहे. खरे म्हणजे त्यामुळे पाकिस्तान वठणीवर येऊन खऱया अर्थाने विकासाच्या मार्गावर यायला हवा होता, पण पाकडेच ते. अमेरिका देत नाही म्हटल्यावर त्यांनी चीनकडे तोंड फिरवले. चीनलाही पाकिस्तानसारखे प्यादे हवेच होते.

कालपर्यंत सौदी-अरेबिया, अमेरिका हे पाकिस्तानचे ‘दाते’ होते, आता ही जागा चीनने घेतली आहे. पाकिस्तानच्या हातातील ‘कटोरा’ मात्र कायम राहिला आहे. या दुरवस्थेसाठी पाकिस्तान स्वतःच जबाबदार आहे. तेच त्या देशाचे वर्तमान आहे आणि भविष्यदेखील!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button