breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांत सीसीटीव्ही

सुरक्षेसाठी अतिरिक्त १,७३५ कॅमेरे बसवण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी

पश्चिम रेल्वेवरील उपनगरी प्रवाशांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. उपनगरीय स्थानकांमध्ये २,८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या प्रस्तावाला नुकतीच रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. यामुळे एकात्मिक सुरक्षेंतर्गत (इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम)या मार्गावरील सर्व उपनगरी स्थानके सीसीटीव्हींच्या कक्षेत येतील. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने यापूर्वीच्या तुलनेत आणखी १,७३५ कॅमेऱ्यांची भर पडेल, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

देशभरातील रेल्वे स्थानकात एकात्मिक सुरक्षेंतर्गत विविध सुरक्षा उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम मध्य रेल्वेच्या स्थानकातही नवीन सुरक्षा साधने बसवतानाच सीसीटीव्हींचाही समावेश होता. आता पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवरही याच सुरक्षा यंत्रणेमार्फत २,८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने नुकतीच मंजुरी दिली. सध्या १,०८० कॅमेरे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर लागलेले आहेत. हे कॅमेरे टप्प्याटप्प्यात बदलून त्याऐवजी नवीन कॅमेरे बसविले जातील. सध्याच्या सीसीटीव्हींची संख्या पाहिल्यास १,७३५ कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. चर्चगेट ते विरापर्यंत सर्व स्थानकांत तर त्यापुढे असलेल्या वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकांतही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

अंधारातही टिपण्याची क्षमता

विरारपुढील स्थानकात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास करताना रेल्वे सुरक्षा दलाला मोठी अडचण येते. सीसीटीव्ही बसल्यास ही अडचण दूर होणार आहे. बसवण्यात येणारे कॅमेरे अंधारातही झालेला गुन्हा किंवा एखादी घटना व्यवस्थित टिपू शकतील.

रेल्वे बोर्डाने २,८१५ सीसीटीव्हींच्या कॅमेरा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावर रेल्वेच्या सिग्नल व कम्युनिकेशन यंत्रणा विभागाकडून काम केले जात आहे. बसविले जाणारे कॅमेरे उत्तम दर्जाचे असतील.  – अनुप कुमार शुक्ला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे (रेल्वे सुरक्षा दल)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button