breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पवार साहेबांना सोडून कसा जाईन? ; पक्षांतराच्या चर्चांना भुजबळांचा पूर्णविराम.

पुणे : मी जेलमधून बाहेर आल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या, पण पवार साहेबांना सोडून कसा जाईन? अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. जेलबाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात हल्लाबोल यात्रेची सांगता करण्यात आली.

अडीच वर्षांनंतर मी जनतेसमोर बोलण्यासाठी उभा आहे. जेलमध्ये असताना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपुलकीने विचारपुस केली, असं छगन भुजबळांनी सांगितले. तसेच जेलमध्ये असताना कुटुंबाची पवार साहेबांनी घरच्यांसारखी काळजी घेतली असे सांगताना भुजबळांना गहिवरुन आले.

न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, आहे आणि राहणार, लवकरच निर्दोषत्व सिद्ध करणार, असंही छगन भुजबळ यांनी ठासून सांगितलं. जेलमध्ये असताना माझ्यासाठी मोर्चे काढण्यात आले, सर्व पक्षांचे नेते भेटायला आले त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानतो असं म्हणत राष्ट्रवादीचा मंच असल्याने आज मनापासून बोलणार असंही भुजबळ म्हणाले.

मला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आलं, जिथे छगन भुजबळ नाव दिसेल तिथे ईडीने धाडी टाकल्या. इतकच काय एकेका ठिकाणी सात वेळा धाडी टाकण्यात आल्या असं म्हणत भुजबळांनी सरकारवर निशाणा साधला.

जेलमधून मी आणि समीर बाहेर आलो, आता खायचं काय ही चिंता होती. मात्र पाहतो तर काय? कुटुंबातील प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख जमा. अशा शब्दात मोदींच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींच्या स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर आता रुईनअप इंडिया दिसेल की काय अशी चिंता वाटते असेही भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी मी कंत्राटदार नेमला नव्हता, इतकंच काय त्यावेळी मी मंत्रीही नव्हतो. 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले, अशा शब्दात भुजबळांनी सरकारवर शेलकी टीकाही केली. म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती निर्माण केल्याचंही आपल्या मिश्किल शैलीत भुजबळांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button