breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘पदाच्या मोहात न पडलेले अहमद पटेल,’ राज ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – कोरोना संसर्गामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनामुळे काँग्रेससहीत इतर पक्षातील नेत्यांनीही हळहळ व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पटेल यांना शाब्दिक श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे म्हणतात की, “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. कायम पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अहमद पटेल यांचं पक्षामध्ये मोठं वजन होते. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचं नावं घेतलं जायचं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button