breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांचा इशारा, व्यापारातील भारताचे प्राधान्य संपवण्याचा प्रयत्न

अमेरिकेबरोबरच्या व्यापारात भारताला मिळणारे विशेष प्राधान्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समाप्त करायचे आहे. ट्रम्प यांनी तसा इरादा जाहीर केला आहे. अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमातर्गत भारताला मिळालेला लाभार्थीचा दर्जा समाप्त करण्याच्या दिशेने ट्रम्प यांनी पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमातर्गत भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ५.६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर कुठलाही कर लावला जात नाही.

भारतात अमेरिकी उत्पादनांवर मोठया प्रमाणात कर आकारला जात असल्याचा मुद्दा त्यांनी अनेकदा उपस्थित केला आहे. भारत सरकारबरोबर बरीच चर्चा झाली. पण अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समन्यायी वागणूक देण्याबाबत भारताकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आपण हे पाऊल उचलत आहोत असे ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ट्रम्प यांना भारताप्रमाणे टर्कीचाही जीएसपी कार्यक्रमातर्गत लाभार्थीचा दर्जा समाप्त करायचा आहे. मागच्या चार दशकात टर्कीच्या अर्थव्यवस्थेत बरीच सुधारणा झाली आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. भारताला जीएसपीतून बाहेर काढण्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर दोन महिन्यांनी अंमलबजावणी सुरु होईल. म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना मिळणारी कर सवलत बंद होईल. अमेरिकेच्या जीएसपी कार्यक्रमाचा जगात भारत सर्वात मोठा लाभार्थी आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी एक झटका आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भारताला दिलेला हा सर्वात मोठा दणका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button