breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गव्हाच्या दरात क्विंटलमागे चारशे रुपयांची घट

दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात वाढलेले गव्हाचे दर आता उतरले आहेत. सध्या राज्याच्या बाजारांत नव्या गव्हाची मुबलक आवक सुरू झाल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गव्हाच्या दरात घसरण झाली आहे. सध्या गव्हाच्या दरात क्विंटलमागे चारशे रुपयांनी घट झाली आहे.

गव्हाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात तसेच पंजाबमध्ये होते. महाराष्ट्राच्या काही भागांत गव्हाची लागवड केली जाते. पंजाबमधील गहू उत्तरेकडील राज्यांत विक्रीसाठी पाठविला जातो. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि गुजरातमधील गव्हाची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. मध्य प्रदेशात अवकाळी पावसामुळे गव्हाच्या लागवडीवर परिणाम झाला होता. त्यामुळे बाजारात गव्हाची आवक मागणीच्या तुलनेत कमी होती.

दोन ते तीन महिन्यांपूर्वी गव्हाच्या दरात वाढ झाली होती. किरकोळ बाजारात एक किलो गव्हाच्या दरात साधारणपणे तीन ते सहा रुपयांनी वाढ झाली होती. घाऊक बाजारात गव्हाच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डातील गव्हाचे व्यापारी विजय नहार यांनी दिली.

नहार म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी गव्हाचा प्रतिक्विंटलचा दर २७०० ते ३२०० रुपये होता. नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यानंतर प्रतवारीनुसार गव्हाचे प्रतिक्विंटलचे दर २३०० ते २८०० रुपये असे आहेत. मध्य प्रदेशातून नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी आले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एक किलो गव्हाचा दर प्रतवारीनुसार २५ ते ३६ रुपये असा आहे. गारपीट तसेच अवकाळी पाऊस झाला नाही तर गव्हाचा हंगाम चांगला होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button