गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘नो डॉल्बी‘
पुणे ( महा ई न्यूज ) – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळास डी.जे. आणि डॉल्बी सिस्टीमचा वापर करता येणार नाही. तसेच मिरवणुकीत वाजवण्यात येणार्या साऊंड सिस्टीमसाठी संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे पत्रक पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीमुक्त आवाजाऐवजी पारंपरिक ढोल-ताशांचा आवाज घुमणार आहे.
उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाची पाताळीही मंडळांना पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडळाकडून काढण्यात येणार्या मिरवणुकीत स्पीकर, साऊंड सिस्टीम आणि मिक्सर करणार्या व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलिसांना देऊन, त्यांचे ओळखपत्र पोलीस ठाण्यातून घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
आवाजाची मर्यादा
औद्योगिक विभागात दिवसा 75 डेसीबल, तर रात्री 70 डेसीबल निश्चित करण्यात आली आहे. वाणिज्य झोनमध्ये दिवसा 65 डेसीबल, तर रात्री 55डेसीबल करण्यात आली आहे. तसेच शांतता झोनमध्ये दिवसा 50 डेसीबल, तर रात्री 40 डेसीबल निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त कोणत्याही मंडळाने आवाजाची पातळी वाढविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे