breaking-newsपुणे

‘कुक्‍कुटपालन योजने’साठी मसुदा तयार करण्याच्या सूचना

  • ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

पुणे- ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने “कुक्‍कुटपालन योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मोठी मदत होणार आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये या योजनेचा मसुदा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पशुपालक महामेळावा आणि राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार महेश लांडगे, विजय काळे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरंदकर, आयुक्त कांतिलाल उमाप आदी या वेळी उपस्थित होते.

आपला देश कृषीप्रधान असूनही शेतकऱ्याचा मुलगा शेती न करता नोकरीच्या शोधासाठी धावपळ करतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधन द्यावे, असे आवाहनही मुंडे यांनी या वेळी केले. मुंडे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघात बचत गटातील प्रत्येक महिलेला गाई देऊन त्या गाई वसतिगृहामध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्या गाईंनी किती दूध दिले, किती पैसे मिळाले याचा हिशेब मोबाईलवर संदेशद्वारे देण्याची योजना आखण्यात येणार आहे. यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असून, हा प्रकल्प भ्रष्टाचारमुक्‍त असेल.

जानकर म्हणाले, समाजकल्याण विभाग आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाजासाठी विशेष योजना सुरू करून पशुधन वाटप केले जाणार आहे. यातून मातंग समाज आपली आर्थिक स्थिती सुधारू शकेल. आजचा शेतकरी ऊस आणि तांदूळ लावण्यातच समाधन मानत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योजक बनले पाहिजे.

हां…जी, हां…जी करण्यापेक्षा शेती करावी वाटते – दिलीप कांबळे
सोलापूरसारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन मी आलो आहे. त्यामुळे मला शेतकरी आणि पशुपालाकांचे दुःख माहित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडल्यामुळे मी मंत्रीपदापर्यंत पोहचलो आहे. गेली चाळीस वर्षे राजकारण करीत असून मला आजही हां…जी, हां..जी, करावे लागत आहे. त्यामुळे आता दोन चार एकर जमीन घेवून निवांत शेती करावी, असा विचार करत असल्याची भावना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्‍त केली. मात्र, त्याचवेळी महादेव जानकर यांनी कांबळे यांना मध्येच थांबवत राजकारणात तुमच भविष्य आहे, त्यामुळे राजकारणापासून दूर जाण्याचा विचार करु नका, असे सांगत विषय टाळण्याचा एक प्रकारे इशारा दिला. दरम्यान, कांबळे यांच्या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button