breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगारांचा बुलंद आवाज हरपला, जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

मुंबई – कामगारांचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी दु:खद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नवी दिल्ली येथील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्झायमर या आजाराने ग्रस्त असलेल्या फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. जॉर्ज यांनी नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांची राजकीय कारकीर्द
*जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम १९६७मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला.

* स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही, असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.

* १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण १९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.

* विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.

* १९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. १९९६च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे १९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला.

* १९९९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला.

* १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते. पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.

* २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना २००९च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button