breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘एक हात मदतीचा’, पिंपरी-चिंचवड शहरात भुकेलेल्यांना अन्न वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात 21 दिवसाची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून देशातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. अशा बिकट परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेला भूक मारीचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात २ रुपये किलो तांदूळ मिळणार आहे. परंतु, सरकारी मदत पोहचण्यास वेळ लागणार असून आपल्याकडील काही कुटुंबाना दररोज कष्ट केल्याशिवाय जेवण मिळत नाही. रोज कमवणे आणि रोज खाणे अशी अवस्था आहे.

“भुकेने व्याकुळ अशा गोरगरीब कष्टकरी जनतेची जबाबदारी समाजाने घ्यावी, अन्नावाचून कोणी गोरगरीब मरू नये” यासाठी समाजातील व्यक्तीने पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भुकेलेल्यांना अन्न एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, शहरातील अनेक समाजसेवी संस्था संघटना एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. बांधकाम मजूर, कागद-काच-पत्रा वेचक, विधवा, कंत्राटी कामगार, परीत्यक्ता, अनाथ अपंग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर आदी जीवन आवश्यक वस्तूंची बॅग देण्याचे काम शहरात सुरू झाले आहे. आत्तापर्यंत निगडी, चिंचवड पिंपरी या परिसरातील अनेक वस्तीत जाऊन त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाची मदत घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हे कार्य सुरू करण्यात आले आहे. कष्टकरी कामगार पंचायत, रिपब्लिकन वाहतूक आघाडी, अग्रवाल समाज संघटना, वडार समाज सामाजिक संघटना, यासह अनेक सामाजिक संघटनांनी यात सहभाग घेतला आहे.

या कामात पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकारी देखील मोलाची मदत करत आहेत. पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, निगडी पोलिस चौकीचे साहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, कष्टकरी कामगार पंचायतचे बाबा कांबळे, वाहतूक आघाडीचे अजित शेख, अग्रवाल समाज संघटनेचे भीमसेन अग्रवाल, वेदप्रकाश गुप्‍ता, अनिल अगरवाल सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख, वडार सामाजिक संघटनेचे संजय बनपट्टे आदी सहभागी आहेत. पुढील काळात व्हाट्सअप नंबर प्रकाशित करण्यात येणार असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे काम सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती अजित शेख यांनी दिली. अत्यंत बिकट आणि घरात अन्न-धान्य नाही आणि जे अन्न धान्य खरेदी करू शकत नाहीत, अशा गरीब कुटुंबाला मदत केली जाणार असल्याचे वेदप्रकाश गुप्ता यांनी सांगितले  आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button