breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतदादा कारखान्याच्या स्थितीचा अभ्यास सुरू: पी. आर. पाटील

सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेण्यासंदर्भात राजारामबापू कारखान्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील शनिवारी जिल्हा बँकेत आले होते. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची त्यांनी भेट घेतली. वसंतदादा कारखान्याची मालमत्ता आणि देणी यांची माहिती घेतली.

वसंतदादा कारखान्याकडील 93 कोटी रुपयांच्या येणेबाकीपोटी जिल्हा बँकेने सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. कारखाना भाड्याने चालविण्यास देण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. कारखाना भाड्याने चालविण्यास देण्याची निविदा सोमवारी निघेल, असे बँकेतून सांगण्यात आले.

दरम्यान, बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी राजारामबापू, सोनहिरा, क्रांती, अथणी शुगर, मोहनराव शिंदे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता. वसंतदादा कारखाना भाड्याने चालवण्यास देण्याची निविदा काढणार असून निविदा भराव्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते.

इच्छुक आहोत; अभ्यासानंतर ठरवू : पी. आर. पाटील

राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील शनिवारी जिल्हा बँकेत आले होते. वसंतदादा कारखान्याकडील मालमत्ता आणि शेतकरी, कामगार, जिल्हा बँक, अन्य बँकांची देणी, शासकीय देण्यांची माहिती त्यांनी घेतली. दरम्यान, वसंतदादा कारखाना भाड्याने चालवण्यास इच्छुक आहात का, या प्रश्‍नावर पी. आर. पाटील म्हणाले, इच्छुक आहोत. मालमत्ता, देण्यांची माहिती घेतोय. अभ्यासानंतर ठरवू. आत्ताच काही सांगणार नाही.

यामुळे निविदेस झाला उशीर

वसंतदादा कारखान्याने व्याजाचे सुमारे 10 कोटी रुपये भरल्यानंतर निविदा काढायचे असे ठरले होते. मात्र सुमारे 7.50 कोटी ते 8 कोटी रुपये भरले आहेत. उर्वरीत दोन-अडीच कोटींच्या प्रतिक्षेत कारखाना भाड्याने देण्याची निविदा काढण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, कारखाना भाड्याने देण्यासाठी सोमवारी निविदा काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button