भारत-श्रीलंका संबंधाच्या फायली इंग्लंडने केल्या नष्ट

लंडन : श्रीलंकामध्ये लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेच्या काळात भारत व श्रीलंका या दोन देशांचे संबंध कसे होते, याचे विश्लेषण करणाऱ्या दस्तऐवजांच्या दोन फायलींसह १९५ फायली इंग्लंडने नष्ट केल्या. याबद्दल संशोधक व पुराभिलेखागार तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
इंग्लंडच्या पुराभिलेखागार धोरणानूसार, श्रीलंकेमध्ये एलटीटीइच्या कारवाया वाढू लागल्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत त्या देशाच्या लष्कराने इंग्लंडच्या एम१५ व सिक्रेट एअर सर्व्हिसेस (एसएएस) या गुप्तहेर संघटनांशी सल्लामसलत केली होती. १९७९ ते १९८० या कालावधीत भारत व श्रीलंका यांच्यात कसे संबंध होते याबद्दलची कागदपत्रे दोन फायलींमध्ये होती.
श्रीलंकेच्या सैन्याने १९८१ साली जाफना येथील ग्रंथालय जाळून टाकले, १९८९ साली जाफनातील वस्तुसंग्रहालय उद््ध्वस्त केले. या घटनांबद्दल सखोल माहितीही त्यात होती. या फायलींबद्दल पत्रकार व संशोधक फिल मिलर यांनी माहितीच्या अधिकारात इंग्लंडच्या परराष्ट्र व राष्ट्रकुल कार्यालयाकडे विचारणा केली होती. इंग्लंडने विविध देशांना केलेली सुरक्षाविषयक मदत, त्या देशात आश्रय मागण्यासाठी अनेक व्यक्तींनी लिहिलेली विनंतीपत्रे, शस्त्रास्त्र खरेदीविक्री व्यवहाराची कागदपत्रे या फायलींमध्ये होती. ती आता नष्ट झाली आहेत.