पक्षवाढीबाबत अजित “दादा” घेणार पदाधिका-यांची झाडाझडती; तीन ठिकाणी होणार बैठका

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अंतर्गत एकोपा वाढविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. तसेच, पक्ष वाढीच्या दृष्टीने आढावा बैठक घेण्यासाठी उद्या बुधवारी (दि. 30) पवार शहरात दिवसभर वेळ देणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात केलेल्या कामावरून “दादा” पदाधिका-यांची झाडाझडती घेणार आहेत.
सत्ताधारी भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्यभरात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अनेक आंदोलने केल्यामुळे पक्षांतर्गत उर्जा निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील अनेक सभा झाल्याने स्थानिक पदाधिका-यांना नवचेतना मिळाली आहे. पिंपरीमध्ये हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार उद्या दिवसभर शहरासाठी वेळ देणार आहेत.
पवार यांच्या उद्या तीन ठिकाणी बैठका होणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी आडीच वाजता आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील केरला भवन आणि चिंचवड पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात बैठका होणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पवार यांच्या बैठकांचे नियोजन केले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय पदाधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पक्षाकडून कळविण्यात आली आहे.