‘त्याने’ पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासह लावून दिलं, अन् अखेरच्या क्षणी मात्र…

लखनऊ : एखाद्या चित्रपटात घडावी तशी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बुधवारी एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं. पतीने आपल्याच पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासह लावून दिलं, इतकंच नाही तर लग्नाच्या वरातीतही तो थिरकला. मात्र, वधूची पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या व्यक्तीला आपल्या भावना नियंत्रणात ठेवता आल्या नाहीत आणि अखेर तो ढसाढसा रडला. सध्या कानपूरमध्ये या वेगळ्या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिगवा येथे राहणारा संचित उर्फ गोलू गुप्ता एका खासगी कंपनीत काम करतो. गोलूचं लग्न फतेहपूरच्या मंझिल गावातील शांती हिच्यासोबत १९ फेब्रुवारी २०१८ रोजी झालं होतं. लग्नानंतर शांती सासरी आली पण तिचं मन येथे लागत नव्हतं. ती रात्रंदिवस मोबाइलवर कोणाशीतरी बोलत असायची. पतीच्याही हे लक्षात आलं आणि त्याने याबाबत तिला विचारणा केली. पतीने विचारल्यावर शांतीने सर्व सत्य सांगितलं. लखनऊमध्ये राहणाऱ्या रवीसोबत माझे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, आणि मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत असं तिने गोलूला सांगितलं. शांतीने सत्य सांगितल्यानंतर, मी शांती आणि गोलूचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला असं गोलूने पत्रकारांना सांगितलं.