breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झोपडय़ांच्या आगीत संशयाचा धूर!

वांद्रय़ातील नर्गिस नगर येथे ८० झोपडय़ा खाक; झोपडीदादांच्या अर्थकारणातून आग लावल्याचा संशय

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्तनगर येथे मंगळवारी लागलेल्या आगीत सुमारे ८० झोपडय़ा जळून खाक झाल्या. पाच वर्षांमध्ये या वस्तीला दुसऱ्यांदा आग लागली. मात्र वांद्रे पूर्वेकडील गरीब नगरप्रमाणे या वस्तीत आग लावण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. अवैध झोपडय़ा बांधून, मजल्यांवर मजले चढवून ते भाडय़ाने देण्याचा प्रकार वांद्रय़ात वर्षांनुवर्षे चालतो आहे. त्यामुळे या आगीमागे झोपडी दादांचे अर्थकारण किंवा अन्य हेतू तर नाही ना, याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे.

वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र झोपडयांमधील गॅस सिलींडरचा स्फोट घडल्याने आग आणखी पसरली. पेटत्या झोपडय़ांमध्ये दोन लहान मुली अडकल्याची माहिती मिळताच दलाच्या एका तुकडीने बचावकार्य करून दोघींना सुरक्षितपणे बाहेर काढले. धुरामुळे अस्वस्थ झालेल्या दोघींना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल पाच तासांच्या शर्थीनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी व तपास सुरू केला आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यात, २६ ऑक्टोबर रोजी वांद्रे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीब नगर येथील अवैध बहुमजली झोपडपट्टीला आग लागली होती. आग लागली तेव्हा महापालिकेकडून अवैध झोपडय़ा जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई थांबावी या हेतूने येथील झोपडीदादा सलीम लाइटवाला आणि त्याच्या साथीदारांनी गरीब नगर येथे जाणुनबुजून आग लावली, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते.

गरीबनगर असो की नर्गिस दत्तनगर दोन्ही ठिकाणी अवैध, बहुमजली झोपडय़ा आढळतात. या झोपडय़ांमध्ये तळमजल्यावर कुटुंब राहते. वरचा प्रत्येक मजला कुटीर उद्योग किंवा गोदाम म्हणून भाडय़ाने दिलेला असतो. झोपडी दादा महापालिका, पोलिसांना हाताशी धरून अगदी २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करून अवघ्या काही तासांत झोपडय़ा उभारतात आणि भाडय़ाने देतात. या झोपडय़ांवर कारवाई होऊ नये यासाठी महापालिका अधिकारी, पोलीस बीट चौकीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खूश केले जाते. मतदार हातचे जाऊ नयेत यासाठी लोकप्रतिनिधीही या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करतात आणि त्या तुटू नयेत यासाठी यंत्रणांवर दबाव आणतात.

अशा वस्त्यांमध्ये राहणारा वर्ग स्थलांतरित, हातावर पोट असलेला श्रमिक असतो. आग किंवा पुरात झोपडय़ांचे नुकसान झाले की झोपडीदादा त्यांना दमदाटी करून, धमकावून हुसकावून लावतात.या पाश्र्वभूमीवर मंगळवारच्या आगीबाबत संशयाचे वातावरण आहे.

नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीमध्ये वेळोवेळी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या पूर्वीदेखील या झोपडय़ांना आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे या झोपडय़ांना लागलेली आग ही जाणूनबुजून घडवून आणलेली घटना तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते.

– आशीष शेलार, आमदार

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button