breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी आमदार लांडेंच्या पुनर्वसनाबाबत अजित”दादां”च्या निर्णयाकडे लक्ष

  • पुढील आठवड्यात अजित पवार यांची शहरात बैठक
  • स्थानिक नेते लांडे यांच्या पुनर्वसनावर चर्चा करणार

पिंपरी – मोदी लाटेचा प्रभाव नाहिसा होत असताना भोसरी विधानसभेची जागा लढविण्यासाठी पालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ता “काका” साने यांनी पक्षाला इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. तत्पुर्वी, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधानपरिषदेची जागा मागितली जात आहे. पक्षाचे कारभारी अजित “दादा” पवार पुढच्या आठवड्यात शहरात येत असल्याने त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघावर गाववाल्यांचेच प्राबल्य कायम राहिले आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी सलग दोनवेळा मताधिक्य गाजवले आहे. मात्र, मागच्या निवडणुकीत महेश लांडगे यांनी त्यांचा पराभव केला. पक्षाचे तिकीट देऊनही लांडे पराभूत झाल्याने अजित दादांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यातच महेश लांडगेंचा राजकीय प्रभाव वाढत गेल्याने लांडेची ताकद खुजी होऊ लागली. “दादां”चा वाढता प्रभाव पाहता लांडे यांना देखील तुल्यबळ अधिकार मिळावेत, असे वाटू लागले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तशी भावनाही पक्षाकडे व्यक्त केली आहे. ती भावना अजित “दादां”च्या यांच्यापर्यंत नेण्याचे काम दत्ता साने यांनी केले आहे. कारण, दत्ता “काकां”चाही त्यात स्वार्थ दडलेला आहे. त्यांना आगामी खालात भोसरी विधानसभा लढवायची आहे. मात्र, लांडे ज्येष्ठ असल्याने आपली डाळ शिजणार नसल्याचे त्यांनी हेरले आहे. तरीही, त्यांनी लांडे यांची शिफारस “दादां”कडे केली आहे. लांडे एकदाचे विधानपरिषदेवर गेले की, पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळणार, यावर “काकां”चा विश्वास आहे. लांडे यांच्या विधानपरिषदेवर जाण्याने शहरात पक्षाची वेगळी ताकद तयार होणार आहे. त्या ताकदीच्या जोरावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने समोरे जाता येणार आहे. यासाठी स्थानिक नेत्यांची एकजूट तयार झाली आहे.

विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांच्यासोबत माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयदेव गायकवाड व अमरसिंह पंडित येत्या 27 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. यापैकी गायकवाड यांच्या जागेवर स्थानिक नेत्यांचा डोळा आहे. गायकवाड यांचा पत्ता कट होऊन ही जागा लांडे यांना मिळावी, अशी नेत्यांची भावना आहे. मात्र, गायकवाड त्यांची आयती जागा सहजासहजी सोडणार नाहीत. तथापि, ही जागा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासाठी निश्चित केल्याचे मानले जात आहे. दुर्रानी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यानंतर पक्षाचे नेते शरद पवार यांचा आदेश बाळगून उमेदवारी माघार घेतली होती. त्यामुळे आमदार गायकवाड यांची जागा त्यांना देण्याचा निर्णय जवळपास फायनल जाल्याचे समजते. तरीही, लांडे त्यांना सोबत घेऊन शहराध्यक्ष संजोग वाघेरे, दत्ता साने, विठ्ठल काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे आदींनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात नुकतीच भेट घेतली आहे. दरम्यान, साहेबांनी विकास कामांवरच चर्चा केल्याने लांडेंचा विषय प्रलंबितच राहिला. आता पुढील आठवड्यात अजित “दादा” शहरात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या संघटन बांधणीसाठी बुथ कमिटी स्थरावर पक्षाचे कामकाज कसे चालले आहे, याची ते माहिती घेणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत साने, काटे, वाघेरे या विषयावर “दादां”सोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती पक्षातील विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली.

पिंपरी, चिंचवड विधानसभेचा उमेदवार कोण असणार?

चिंचवड विधानसभा मतदार संघात पक्षाकडून इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यातच मागच्यावेळी पक्षाने तिकीट दिले असताना देखील नाना काटे यांना भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आगामी निवडणुकीचे तिकीट त्यांना मिळेल याबाबत साशंकता आहे. तथापि, त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर यांची नावे चर्चेत आहेत. तर, पिंपरी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार अण्णा बनसोडे, अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत बनसोडे यांचा शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी पराभव केला. या दोन्ही मतदार संघातील पक्षाचे उमेदवार कोण असणार?, यावर “दादा” चर्चा करणार आहेत का? असा प्रश्न कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. एकादा का “दादां”नी उमेदवार निश्चित केला की, आम्हाला कामाला लागणे सोपे होईल. त्यामुळे “दादां”नी पिंपरी आणि चिंचवड विधानसभेसाठी पक्षाच्या उमेदवारांची तातडीने घोषणा करावी, अशी कार्यकर्त्यांची आपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button