breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून विद्यार्थिनी वसतिगृहाजवळ गोळीबार

गोळीबारानंतर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : एका विद्यार्थिनी वसतिगृहात बेकायदा प्रवेश करणाऱ्या युवकाला हटकल्याने त्याने सुरक्षारक्षकाच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. त्यानंतर युवकाने वसतिगृहातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रेमप्रकरणातून या युवकाने युवतीला धमकावण्याचा प्रकार केला होता.

सूरज महेंद्र सोनी (रा. ग्वालियर, मध्य प्रदेश) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो ग्वालियरमधील एका खासगी कंपनीत कामाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीचे एका महाविद्यालयीन युवतीवर प्रेम होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युवतीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. मंगळवारी सकाळी तो युवती राहत असलेल्या वसतिगृहाच्या परिसरात आला. थोडा वेळ तेथे घुटमळल्यानंतर त्याने दरवाजातून वसतिगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षारक्षकाने त्याला हटकले. नंतर त्याने वसतिगृहाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘युवतीला ताबडतोब बोलावून घ्या,’ असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरक्षारक्षकाने त्याला ढकलले.

सोनीने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून सुरक्षारक्षकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रसंगावधान राखून सुरक्षारक्षक वाकल्याने तो बचावला. दरम्यान, सोनीचा आरडाओरडा ऐकून विद्यार्थिनी घाबरल्या. सोनी वसतिगृहात शिरला आणि थेट पाचव्या मजल्यावर गेला. तेथून त्याने उडी मारली. पाचव्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळलेल्या सोनीला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सोनीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगणे, आत्महत्येचा प्रयत्न तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ढोमे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button