breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे राजीनामे

२३ एप्रिल रोजी वैमानिकांची मुंबईत बैठक

मुंबई : जेट एअरवेजमधील आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या जेटच्या वैमानिकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरातील ७० पेक्षा जास्त वैमानिकांनी राजीनामे दिले असून शुक्रवारीही राजीनामासत्र सुरूच होते. ऑक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत २५० पेक्षा जास्त वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. वेतनप्रश्नावर तोडगा निघावा यासाठी मुंबईत २३ एप्रिल रोजी वैमानिकांची बैठक होत आहे. त्याआधी वैमानिकांची व्यवस्थापनासोबतही बैठक घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

वेतनप्रश्नी तोडगा निघत नसल्याने हतबल झालेले वैमानिक नोकरीसाठी अन्य विमान सेवांकडे प्रयत्न करत आहेत. जेटमध्ये १,५०० पेक्षा जास्त वैमानिक कार्यरत होते. ऑक्टोबरपासून वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर वैमानिकांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली होती. आता १,२०० वैमानिकच सेवेत आहेत. शुक्रवारीही काही वैमानिकांनी व्यवस्थापनाकडे राजीनामे सुपूर्द केले. १० मेपर्यंत तोडगा निघाला नाही, तर राजीनामासत्र सुरूच राहणार आहे. दरम्यान, वेतनाचा प्रश्न सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांपाठोपाठ वैमानिकही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भाषा बोलू लागले आहेत. मुंबईत होणाऱ्या वैमानिकांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल. गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळवण्यासाठी जेटच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. वैमानिकांकडून देशाला लाखो रुपयांचा प्राप्तिकर मिळतो. तो प्रामाणिकपणे भरूनही आमच्या अडचणीच्या काळात सरकार आम्हाला मदत करत नाही आहे, अशी प्रतिक्रिया एका वैमानिकाने व्यक्त केली.

मुंबईत २३ एप्रिल रोजी वैमानिकांची बैठक होत आहे. त्याआधी आम्ही व्यवस्थापनाशीदेखील चर्चा करण्याचा प्रयत्न करू. या चर्चेनंतरच वैमानिक मतदानावरील बहिष्काराबाबत आपली भूमिका निश्चित करतील, अशी प्रतिक्रिया नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे सदस्य कैजर अहमदाबादी यांनी दिली.

कामगार आयुक्तालयाकडे तक्रार

वैमानिकांच्या हक्काचे वेतन मिळावे यासाठी नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड कामगार आयुक्तांकडेही दाद मागणार आहे. कंपनी बंद झाल्यास किमान वेतन मिळावे यासाठी संघटनेचा प्रयत्न आहे.

जेट व्यवस्थापनाने वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यासही मनाई केली आहे. तसे आदेशच काढले आहेत. त्यामुळे जेटकडून कर्मचाऱ्यांची सर्व बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका कर्मचारी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button