रेल्वेमध्ये महिला विसरली एक लाखांचे दागिने…; पुढे जे घडले ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल
![Woman forgot jewelry worth one lakh in train...; You will also be amazed to read what happened next](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Woman-forgot-jewelry-worth-one-lakh-in-train...-You-will-also-be-amazed-to-read-what-happened-next.jpg)
परभणी: देवगिरी एक्सप्रेसने मुंबई ते परतुर दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे रेल्वेमध्ये विसरलेले एक लाख वीस हजार रुपयांचे दागिने सेलु रेल्वे पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये शोध घेऊन महिलेच्या पतीला परत केले आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पोलिसांनी दागिने परत केल्याने महिला प्रवासी रीना गरड या भारावून गेल्या होत्या.
परतुर येथील रीना गरड या मुंबईवरून परतूर येथे येण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. यावेळी गाडी परतुर रेल्वे स्थानकावर आली असता त्या दागिने, मोबाईल आणि काही रक्कम देवगिरी एक्सप्रेस गाडीमध्ये विसरल्या. गाडीने परतुर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर हा प्रकार रीना यांच्या लक्षात आल. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी याबाबतची माहिती सेलु रेल्वे पोलिसांना दिली.
माहिती मिळतात पोलीस कर्मचारी रोहिदास नाटकर, रेल्वे सुरक्षा दलाचे पडळकर, गायकवाड यांनी देवगिरी एक्सप्रेस सेलू रेल्वे स्थानकावर येतात गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये त्यांना महिला प्रवाशाची पर्स आढळून आली. पर्स सापडली असल्याची माहिती पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर महिलेचे पती नागशन गरड हे पाठीमागून येणाऱ्या पुणे एक्सप्रेसने सेलू रेल्वे स्थानकावर दाखल झाले. अवघ्या तीन तासांमध्ये रेल्वे पोलिसांनी महिलेचे एक लाख वीस हजार रुपये दागिने महिलेच्या पतीच्या स्वाधीन केले. त्यामुळे रेल्वे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.