हिंदू-मुस्लिमांच्या संयामाचे कौतूक करणार का? राष्ट्रीय जनमंच पक्षाचा राज ठाकरे यांना सवाल
![Will you appreciate the restraint of Hindus and Muslims? Question to Raj Thackeray of Rashtriya Janmanch Paksha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Raj-Thackeray-1.jpg)
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्याच वेळात पुण्यात सभा होत आहे. या सभेत ते काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षाने त्यांचे राज्य व देशातील काही प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांनी या विषयांवरही बोलावे, अशी मागणी केली आहे. ‘आपण उपस्थिती केलेल्या मशिदीवरील भोंग्याचे प्रश्नाने राज्यात व देशात सामाजिक जनजागृती झाली. परंतू मुस्लिम बांधवांनी देखील समजुतदारपणाची भूमिका घेतल्याने देशात व राज्यात कोठेही सामाजिक तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा बिघडला नाही. याबाबत हिंदू-मुस्लीम बांधवानी जो संयम दाखवला त्याबाबत आपण त्यांचे कौतुक करणार आहात का?, असा सवाल राष्ट्रीय जनमंच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन थोरात यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ‘आपण घेतलेल्या राजकीय भुमिकांकडे आम्ही लक्ष देऊन विचारपूर्वक पहात असतो. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे आपण टी.आर.पी.च्या दृष्टीकोणातून अत्यंत लाडके आहात. आपल्या भाषणाचा इतका मोठा परिणाम होतो की, युक्रेन-रशियाचे जागतिक पातळीवरील युध्द मिडीया विसरुन गेली आहे. राज्यातील व देशातील आपल्या चाहत्या वर्गाचा व आपल्यावर प्रेम करणारे लोकांचे आपल्याकडे सातत्याने बारीक लक्ष्य असते. त्यामुळे त्यांच्या मनातील मुद्द्यांवरही आपण बोलावे. राज्यात कोठेही लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मग या रॅपिडफायर सभा कशासाठी असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेस पडला आहे. जतना आश्चर्यचकीत होऊन आपणाकडे पहात आहे. हे काय चालले आहे ते त्यांना समजून येत नाही ते गोंधळून गेले आहेत. त्याबाबत आपण थोडे मार्गदर्शन करावे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक कोणकोणत्या दैनंदिन मुलभुत प्रश्नांना त्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. त्या प्रश्नांना आपण वाचा फोडताना दिसत नाहीत. जनतेला न्याय देत अशी जनतेची माफक अपेक्षा होती परंतू आपण या उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना दिसत नाही. आपली मुंबई, ठाणे येथील जाहिर सभा पुणे येथील भगवी शाल पांघरुन केलेली हनुमान चालीसा महाआरती, औरंगाबाद येथील सभा व लगेचच मुंबई येथील पत्रकार परिषद व लगेचच पुढील १५ दिवसात पुन्हा आपण पुण्यात जाहिर सभा घेत आहात असे समजले म्हणून आपणास हे आवाहन करण्यात आहोत की, या प्रश्नांचा देखील आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख करावा. या सगळया घटनाक्रमाचा अर्थ समजण्याच्या आत पुन्हा तातडीने आपण पुणे येथे सभा घेत आहात. आपणाला व आपण घेतलेल्या राजकीय भुमिकांकडे देशातील तरुण खुप मोठया आशेने आपणाकडे पहात आहेत. आपण सवंग क्षणिक लोकप्रियतेच्या मुद्दांना हात न घालता महाराष्ट्रातील व देशातील सर्वसामान्य जनतेच्या मुलभुत जीवंत प्रश्नांना हात घातल्यास व त्यांना वाचा फोडल्यास या पेक्षाही जास्त मोठया प्रमाणावर जनता आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आता तीन पक्षाचे राज्यात सरकार आहे ते सत्तेत आहेत व भाजपाला सत्तेची घाई झाली आहे. त्या घाईत महाराष्ट्राचा बिहार करुन टाकलेला आहे, हे निश्चित. यापूर्वी महाराष्ट्रात राजकारणाची एवढी पातळी खाली गेलेली महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली नाही. परंतू राज्यात तशा अर्थाने विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही आपण उपरोक्त प्रश्नांकडे गंभीर्याने पाहिल्यास राज्यातील जनता आपले त्रिवार अभिनंदन केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे आपणास जाही अवाहन करण्यात येते की, पुणे येथे होणाऱ्या आपल्या सभेत आपण या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी व राज्यातील जनतेला न्याय द्यावा, असेही थोरात यांनी म्हटले आहे.