राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी घेतली ‘मटा ऑनलाइन’च्या व्हिडिओची दखल; म्हणाले…
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलं. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी मला माझ्या जवळच्याच माणसांनी दगा दिल्याची भावना बोलून दाखवली. मात्र राज्यातील जनता अत्यंत खंबीरपणे माझ्यासोबत उभी होती, असंही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘मटा ऑनलाइन’च्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला.
खरंतर शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यापासूनच यंदा आषाढी एकादशीला होणारी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा कोण करणार, याची चर्चा होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद वाचवून विठुरायाची पूजा करणार की त्यांना धक्का देत भाजपच्या मुख्यमंत्र्याला पूजेचा मान मिळणार, याबाबत बोललं जात होतं. मटा ऑनलाइनने याबाबतच वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांना बुधवारी प्रश्न विचारला. त्यावेळी काही वारकऱ्यांनी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडून आषाढी एकादशीला विठुरायाची पूजा झालेली आवडेल, असं म्हटलं होतं. हा व्हिडिओ थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी राज्याला संबोधित करताना या व्हिडिओचा उल्लेख केला.
‘आजसुद्धा माझ्याकडे काही व्हिडिओ आले आणि वारकरी सांगतायत की आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच विठुमाऊलीची पूजा हवी आहे, पण त्यांना मला सांगायचं आहे की जे काही होईल ते चांगलंच होईल,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.