पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना होणार मोठा दंड!
रेल्वे कायद्यात बदल गरजेचा
![Western, Railways, Ticketless, Travel, Large, Fine, Railways, Laws, Changes,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/realway-780x470.jpg)
मुंबई : पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. प्रवास श्रेणीनुसार दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवासासाठी सेकंड क्लास, फर्स्ट क्लास आणि एसी लोकल असे तीन प्रकार आहेत. सध्या विनातिकीट प्रवाशांकडून २५० रुपये दंड आणि प्रवासाच्या तिकिटाचे शुल्क मिळून एकूण २५५ रुपये आकारले जातात. फर्स्ट क्लासमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून २५० रुपये दंड, तिकिटाचे मूळ शुल्क आणि १५ रुपये जीएसटी मिळून अधिक रक्कम वसूल केली जाते; परंतु विनातिकीट प्रवाशांवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने नव्या प्रस्तावात विविध श्रेणींनुसार दंड आकारण्याची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हा नियम लागू होईल.
1. स्लीपर क्लास : विनातिकीट प्रवास आढळल्यास ५०० रुपये दंड
2. फर्स्ट क्लास : ७५० रुपये दंड तसेच अतिरिक्त जीएसटी
3. एसी लोकल : १,००० रुपये दंड, त्यासोबत अतिरिक्त जीएसटी
रेल्वे कायद्यात बदल गरजेचा
हा प्रस्ताव लागू करण्यासाठी रेल्वे कायद्यात बदल आवश्यक असून, त्यासाठी लोकसभेत मंजुरी घेणे गरजेचे आहे. कोरोनानंतर उपनगरीय लोकल मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका वेळी ५० ते १०० टीसी स्थानकात तपासणीकरिता तैनात करण्यात येत आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावरील तिकीट खिडक्यांवर २५ ते ३० टक्के तिकिटांची विक्री वाढल्याचे निदर्शनास आले आहे.