विधिमंडळ सचिवांनी बोलावली तातडीची बैठक; अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला?
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नवं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचं दिसत आहे. कारण विधिमंडळ सचिवांना अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी आज दुपारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसंच या अधिवेशनाची तयारी कशा पद्धतीने करण्यात यावी, याबाबत बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ‘राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तुम्ही जो विचार करत आहात, त्यापेक्षा लवकर होईल. सर्वोच्च न्यायालयाने विस्तार करू नका, असे सांगितलेलं नाही. त्यामुळे न्यायालयातील सुनावणीसाठी विस्तार रखडलेला नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत स्पष्ट केलं.