Udaipur Murder: ४५ दिवसांचं ट्रेनिंग, पाकिस्तानशी संबंध; उदयपूर हत्याकांडातील आरोपींची कुंडली वाचून हादराल
![Udaipur Murder: 45 days training, relations with Pakistan; You will be shocked to read the horoscopes of the accused in the Udaipur massacre](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Udaipur-massacre.png)
उदयपूर : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उदयपूर हत्याकांडामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भर दिवसा कन्हैया लाल यांच्या दुकाना घसून दोघांनी त्यांची निर्घृण हत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात आरोपी गौस मोहम्मदचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानचे डीजीपी एम.एल. लाठर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हत्येतील आरोपी गौस मोहम्मद याचं पाकिस्तानातील दावत-ए-इस्लामी या इस्लामिक संघटनेशी संबंध आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये तो कराचीलाही गेला होता. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की गौस मोहम्मदने दुसरा आरोपी रियाझ यालाही कट्टरपंथी केलं होतं. दोघांनी कन्हैयालाल (४८) यांच्या धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हाती घेतला आहे.
लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी आरोपींनी व्हिडिओ बनवला असल्याचं एजन्सीने म्हटलं आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध दहशतवाद विरोधी कायदा UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांनी त्यांची कुंडलीच काढली आहे.
गौसने रियाझच्या मनात भरलं विष
या दोन्ही आरोपींचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. यामध्ये गौस मोहम्मद आणि रियाझ दिसत आहेत. या दोघांनी हत्येची जबाबदारी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली आहे. राजस्थान डीजीपीच्या म्हणण्यानुसार, दोघे एकत्र राहत होते. गौसनेच रियाझला कट्टरपंथी केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ वेल्डिंगचे काम करतो आणि गौस मोहम्मद हा किरकोळ काम करायचा. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या खंजीरने कन्हैया लालची हत्या करण्यात आली ती खंजीर रियाझने ४-५ वर्षांपूर्वी बनवली होती, असेही तपासात समोर आले आहे.
हे दोघेही तब्बल ८ मोबाईल क्रमांकावरून पाकिस्तानशी सतत संपर्कात होते. यासोबतच आरोपी गौस मोहम्मद हाही अरब देश आणि नेपाळमधून आला होता. दोन्ही आरोपींच्या इतर देशांतील संपर्कांचीही माहिती समोर आली आहे.
कधी आणि कुठे झाली सुरुवात?
दावत-ए-इस्लामी एक गैर-राजकीय इस्लामिक संघटना म्हणून ओखळली जाते. याची स्थापना १९८१ मध्ये कराची, पाकिस्तान इथं झाली. मौलाना अबू बिलाल मुहम्मद इलियास यांनी या इस्लामिक संघटनेची स्थापना केली. ही संस्था गेल्या चार दशकांपासून भारतात कार्यरत आहे. शरियत कायद्याचा प्रचार करणं आणि त्यातील शिकवणी लागू करणं हा संस्थेचा उद्देश आहे. या संस्थेने १००हून अधिक देशांमध्ये आपलं जाळं पसरवलं आहे.
भारतात कधीपासून सक्रिय?
दावत-ए-इस्लामी ही संघटना भारतात १९८९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर पाकिस्तानातील उलेमांचे शिष्टमंडळ भारतात आलं. यानंतर ही संघटना हळूहळू भारतात आपली पाळेमुळे घट्ट करत गेली. या संघटनेची मुंबई आणि दिल्ली इथं मुख्यालयं आहेत. या संघटनेचे बहुतेक सदस्य हिरव्या रंगाची पगडी घालतात. ही संस्था आपला संदेश देण्यासाठी दरवर्षी इज्तिमा (जलसा) आयोजित करते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. यांचं मदनी नावाचं एक चॅनलही आहे.
व्हिडिओ तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…
एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपींनी हत्येचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला. देशात दहशत निर्माण करण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हत्येची जबाबदारीही घेतली आहे’. कन्हैयालाल यांची हत्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे झाली होती, ज्यात त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते.