विम्याचे १ कोटी रुपये मिळवण्यासाठी महिलेने स्वत:चंच कुंकू पुसलं; सुपारी देऊन पतीची हत्या
![The woman wiped her own kumkum to get Rs 1 crore of insurance; Husband killed by betel nut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/The-woman-wiped-her-own-kumkum-to-get-Rs-1-crore-of-insurance-Husband-killed-by-betel-nut.jpg)
बीड : बीडमध्ये १ कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी एका महिलेने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंचक गोविंद पवार (वय ४५, रा.वाला, ता. रेणापूर जि. लातूर) असं मृत व्यक्तीचं नाव असून गंगाबाई मंचक असं आरोपी पत्नीचं नाव आहे. मारेकऱ्यांनी पवार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत त्यांचा खून केला आणि नंतर हा अपघात असल्याचं भासवलं. मात्र बीड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून या हत्याकांडाचा उलगडा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मंचक यांच्या निधनानंतर पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी आरोपींना १० लाख रुपयांची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी २ लाख रुपये आधीच मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार (वय ३७, रा . वाला, ता . रेणापूर जि . लातूर), श्रीकृष्ण सखाराम बागला (वय २७, रा. काकडहिरा, ता.बीड), सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (वय ४७, रा . पारगाव सिरस ता. बीड) आणि अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील पत्नीसह ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार दोघांचा तपास सुरू आहे.