कोरोनाविरोधातील लढ्यात सचिनही मैदानात; ऑक्सिजनसाठी १ कोटी रुपयांची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Sachin_Tendulkar.jpg)
नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर माजवला आहे. त्यातच निर्माण झालेल्या औषध आणि ऑक्सिजनच्या टंचाईने अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी अनेक देश-विदेशातील दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केले आहे. आता भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. त्याने या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. सचिनने यापूर्वी गेल्या वर्षीही अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. आता मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली आहे. त्याने म्हटलंय, ‘मी खेळत असताना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो. आज आपण कोरोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे’, अशा आशयाचा संदेश यावेळी त्याने दिला आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2021
दरम्यान, रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये सहभागी झाल्यानंतर सचिनलाही कोरोनाची लागण झाली होती. ही स्पर्धा संपवून घरी आल्यावर सचिनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी कोरोनावर मात करून सचिनने ‘मी प्लाझ्मा दान करणार असून तुम्हीही प्लाझ्मा दान करायला हवे’, असे आवाहन सर्वांना केले होते.