नागपूर सामूहिक आत्महत्या प्रकरण: संगीता यांची झुंज अपयशी, तर मुलाचा मृत्यूशी लढा
![Nagpur mass suicide case: Sangeeta's fight fails, son's fight to death](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Nagpur.jpg)
नागपूरः वर्धा मार्गावरील खापरी पुनर्वसन परिसरातील जळीत कार प्रकरणात अखेर बेलतरोडी पोलिसांनी खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गंभीररीत्या होरपळलेल्या संगीता रामराज भट (वय ५५, रा. जयताळा) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वर्धा मार्गावरील खासगी हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा नंदन (वय २५) हा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढा देत आहे.
१९ जुलैला रामराज भट (५८) यांनी स्वत:सह संगीता व नंदन यांच्या अंगावर पेट्रोल टाकून कार जाळली. कारमध्येच जळून रामराज यांचा मृत्यू . जखमी संगीता यांनी नंदन या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संगीता यांचे बयाण नोंदविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नंदनचे प्राथमिक बयाण नोंदविले. आर्थिक तंगीतून रामराज यांनी स्वत: जाळून आत्महत्या केली व आम्हालाही जाळल्याचे तो सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच ‘बाबांना वाटायचे की मी नोकरी करावी’, असेही त्याने पोलिसांना सांगितले होते.
रामराज यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर रविवारी रात्री याप्रकरणात रामराज यांच्याविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, बेलतरोडी पोलिसांनी भट यांच्या नातेवाइकांकडेही चौकशी केली. २०१४मध्ये भट यांनी कंपनी बंद केली. तेव्हापासून ते आर्थिक संकटाचा सामना करीत होते. नंदनच्या शिक्षणासाठी ते गोव्यातही काही काळ वास्तव्यास होते. यादरम्यान त्यांनी संपत्ती विकून राहते घर गहाण ठेवले होते. त्यानंतर ते जयताळा येथे भाड्याने राहायचे, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.