Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

शंभरावर गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला, मोबाइल सेवा ठप्प

नागपूरः तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नदी, नाल्यांवरील पूल पाण्याखाली आले आहेत. शंभरावर गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. यासोबतच बीएसएनएलची मोबाइल आणि इंटरनेट सेवाही ठप्प पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मेडीगट्टा-कालेश्वर धरणाचे ८१ दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, चंद्रपूर जिल्ह्यातील इरई, वर्धा जिल्ह्यातील लाल नाला आणि निम्न वर्धा प्रकल्पांचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

दक्षिण गडचिरोलीतील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे एकट्या भामरागड तालुक्यातील ५३ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्ग काही वेळ सुरू झाला. नंतर कुडकेली नाल्याच्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प पडली. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील कर्जेल्ली, रामासीगुडम, कोपेला ही गावेही संपर्काबाहेर गेली आहेत. मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. वेलगूर येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली.

वीज कोसळून मुलाचा मृत्यू

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे शेतात असताना वीज कोसळून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजतादरम्यान घडली. कुणाल लक्ष्मण बागळे रा. सलंगटोला(मुंडीपार) असे मृत मुलाचे नाव आहे.

शेतकरी वाहून गेला

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील बोराळा येथे शेतावर जात असताना शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. नवलाजी पांडुरंग तुपट (५५), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. राजुरा तालुक्यातील नोकारी येथील ४५ वर्षीय व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली होती. या दोघांचाही शोध सुरू आहे.

युवकाचा शोध सुरूच

अमरावती : धारणी तालुक्यातील दिया परिसरातून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा सोमवारीही शोध सुरूच होता. अमरावतीवरून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. दिया येथील कृष्णा उर्फ शांतीलाल लखन कास्देकर (वय ३६ ) हा रविवारी सकाळी दिया येथून धारणमहू गावाकडे सिपना नदीचा पूल ओलांडून मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. परत गावाकडे येत असताना अचानक सिपना नदीला पूर येऊन कृष्णा वाहून गेला. दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button