सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार! शिर्डीत २२ जोडप्यांचे ‘सव्वा रुपयात’ शुभमंगल
![Great support for community wedding ceremony! Good luck to 22 couples in Shirdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/ahamadnagar.jpg)
अहमदनगर : शिर्डीतील ‘सव्वा रुपयात लग्न’ या उपक्रमात यंदा २२ जोडप्यांचे शुभमंगल झाले. या उपक्रमात आतापर्यंत २१०० सर्वधर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासबापू कोते व त्यांच्या पत्नी सुमित्रा कोते यांनी २००१ मध्ये ही चळवळ सुरू केली आहे. गरीब कुटुंबातील नववधू-वरासाठी हा सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार बनला आहे.
यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातून गरीब कुटुंबातील वधू-वर शिर्डीत येऊन विवाहबद्ध होतात. यंदा २२ जोडपी बोहल्यावर चढली. त्यात १५ आंतरजातीय जोडप्यांचा समावेश आहे. वधु-वरांना पोशाख,बुट,चप्पल,संसार उपयोगी भांडी,सोन्याचे मंगळसुत्र भेट देण्यात आले. वधूवरांचे कन्यादान आयोजक कैलास बापू कोते व सुमित्रा कोते यांनी केले. या विवाह सोहळ्यातून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’, ‘स्त्री भ्रुण हत्या टाळा’, ‘हुंडा घेऊ नका- देऊ नका’ ‘वृक्षारोपण करा’,’शेतक-यांनो आत्महत्या करु नका’, ‘आपल्या मुला-मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातच करा’,’अनावश्यक खर्चास फाटा दया’ असे संदेश देण्यात आले.
या चळवळीचे प्रणेते कोते म्हणाले, पैशाअभावी लग्न होण्यास अडचणी येणाऱ्या गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलीचे लग्न लावून देणे या प्रमुख उद्देशाने हा सामुदायिक विवाह सोहळा आम्ही २००१ मध्ये शिर्डीत सुरु केला. महारष्ट्रासह बाहेरील राज्यातील कुटुंबे येथे येऊन आपल्या मुलांचे लग्न लावतात. लग्न करू इच्छिणाऱ्या वधु-वराकडून केवळ सव्वा रुपया शुल्क आकारतो. साईबाबा हे सर्वधर्मियांचे प्रतिक असल्याने शिर्डीत येऊन आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या दरवर्षी लक्षणीय असते.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, आमदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, रमेश गिरी, उद्धव मंडलिक, काशिकानंद, बाळू आहेर यी महंतांसह भगीरथ होन, विजय कोते उपस्थित होते.