अकोल्यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाएसटी बसमधून मोफत प्रवास योजना सुरु
Free travel scheme for senior citizens above 75 years in Akola by ST bus
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/75-Years-ST-Pravam-Mofat-1-780x470.jpg)
- योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास सुसाट…
अकोला । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या संबंधित योजनेची घोषणा करण्यात आली. २६ ऑगस्टपासून या योजनेला प्रारंभ झाला असून ज्येष्ठांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. अकोल्यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाएसटी बसमधून मोफत प्रवास योजना सुरु झाली असून, या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्य शासनाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येईल तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ करण्यात आला. २६ ऑगस्ट पासून ज्येष्ठांच्या मोफत एसटी प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या ४ दिवसात राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले. तर राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी आलेल्या नोंदणीपैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार असल्याची माहिती देखील चन्ने यांनी दिली आहे.