नवीन मोबाइल स्वस्तात देतो, असे सांगून ग्राहकांच्या हाती कालबाह्य, बंद, जुने मोबाइल देऊन फसवणूक
![Fraud by giving out-of-date, locked, old mobiles to customers by claiming that they are offering new mobiles at cheap prices](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Fraud-by-giving-out-of-date-locked-old-mobiles-to-customers-by-claiming-that-they-are-offering-new-mobiles-at-cheap-prices.jpg)
मुंबई | नवीन मोबाइल स्वस्तात देतो, असे सांगून ग्राहकांच्या हाती कालबाह्य, बंद, जुने मोबाइल देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्या मालाड येथील गोदामामधून सुमारे दीड कोटी रुपयांचे जुने मोबाइल हस्तगत केले आहेत. अटक करण्यात आलेले दोघे कंपनीचे मालक असून, सोशल मीडियावर स्वस्तामध्ये मोबाइलविक्रीची जाहिरातबाजी करून त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले होते.
फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर १८ ते २० हजार रुपये किंमतीचे मायक्रोमॅक्स, वायको, ओपो, रेनो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल केवळ तीन ते चार हजार रुपयांना असल्याची जाहिरात देऊन एक कंपनी ग्राहकांना फसवत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११चे पोलिस निरीक्षक सचिन गवस यांना मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, भरत घोणे, अभिजित जाधव, पूनम यादव, विशाल पाटील यांच्या पथकाने मालाड काचपाडा येथील ‘राहील इम्पेक्स’ या कंपनीवर छापा टाकला. या ठिकाणी सुमारे २० कर्मचारी काम करताना आढळले. ऑर्डर स्वीकारण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. तर काही कर्मचारी जुन्या मोबाइलची साफसफाई करताना आढळले. या कर्मचाऱ्यांची चौकशी करून पोलिसांनी कंपनीचा मालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. कंपनीच्या गोदामामधून तीन हजारांपेक्षा अधिक मोबाइल हस्तगत करण्यात आले. हे सर्व मोबाइल जुने असून, बहुतांश बंद असल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.
सुमारे तीन कोटींची फसवणूक
या कंपनीने देशभरातील पाचशेपेक्षा अधिक ग्राहकांची जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यातील फसवणूक झालेले ग्राहक हे बहुतांश मुंबई आणि राज्याबाहेरील आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांचा यात समावेश आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर एखादा ग्राहक आपल्यापर्यंत पोहचू नये, यासाठी मुंबई आणि राज्याबाहेरील ऑर्डर स्वीकारली जात होती.
कॅश ऑन डिलीव्हरी
कुणाला संशय येऊ नये, यासाठी जाहिरातीमध्ये कंपनीने कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय ठेवण्यात आला होता. पार्सल कुणी उघडल्यास त्यांना थातुरमातुर कारण सांगून डिलिव्हरी करणारा निघून जात असे. ग्राहक यांच्यात कॉल सेंटरमधील कस्टमर केअरमध्ये संपर्क करीत, मात्र त्याठिकाणी देखील उडवाउडवीची उत्तरे मिळत. फसवणूक झालेल्या ग्राहकांचा पोलिस शोध घेत आहेत.