Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

…अखेर रामदास कदम यांचाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, पहिल्या फळीतील शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam Resignation) यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं, अशी खंत व्यक्त करत त्यांनी जय महाराष्ट्र केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून ज्यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून कोकणात शिवसेना पक्ष वाढवला, नारायण राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यावर त्यांच्याविरोधात कोकण पिंजून काढलं, महाराष्ट्रातलही शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रसंगी भाजपवरही तुटून पडले, त्याच रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम कधीच केलं नाही. उलटपक्षी माझा आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं, अशी खंत त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

* कोण आहेत रामदास कदम?

शिवसेनेतला अत्यंत आक्रमक चेहरा, मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळख
आघाडी सरकारच्या काळात २००५ ते २००९ पर्यंत विरोधी पक्षनेते
कोकणातून सलग चारवेळा विधानसभेवर, २०१४ ला विधानसभेवर
फडणवीस सरकारच्या काळात रामदास कदम यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम केलं

* तीन वर्ष तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार, रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना सनसनाटी पत्र

सन्माननीय उध्दवजी ठाकरे,
यांसी
जय महाराष्ट्र !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button