TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्रीय नेतृत्वाचा ‘तो’ आदेश अन् देवेंद्र फडणवीसांना स्वीकारावे लागले उपमुख्यमंत्रीपद

नवी दिल्लीः राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांची निवड करून राजकीय वर्तुळाला धक्का दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे निर्देश दिले. नाराज फडणवीस यांनी त्यास नकार दिला, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना जाहीर विधान करायला लावून आणि नंतर अमित शहा यांनी फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी होण्यास बाध्य केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कोणत्याही पदाच्या लालसेसाठी वा पदासाठी नाही. आम्ही विचारांसाठी आहोत. विचारांना समोर ठेवतानाच महाराष्ट्रातील जनतेचा विकास व्हावा आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्या या गोष्टीला लक्षात ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरविले आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होऊन पदभार स्वीकारला पाहिजे, असे जाहीर विधान मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून नड्डा यांना करावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यासाठी त्यांना व्यक्तिशः आग्रह करण्यात आला आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा, असे केंद्रीय नेतृत्वाने त्यांना निर्देश दिले आहेत. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला एक विकसित प्रदेशाच्या रूपाने उभा करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन नड्डा यांना करावे लागले.

नड्डा यांनी जाहीरपणे आवाहन केल्यानंतरही नाराज फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते. पण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करीत, महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हिताखातर फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करताना आपण सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे संकेत दिले होते. आज केवळ एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे फडणवीस यांनी जाहीर केले. तेव्हा फडणवीस यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आले आहे, याचा कोणाला अंदाजही नाही आला. पण त्यानंतर नड्डा यांनी फडणवीस यांना माध्यमांद्वारे जाहीर आवाहन करून सरकारमध्ये सामील होण्याचे ‘निर्देश’ दिले तेव्हा मात्र भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत मुख्यमंत्रिपदावरील देवेंद्र फडणवीस यांची दावेदारी बाजूला का ठेवली यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पण मोदी-शहा यांच्याच निर्देशावरून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रिपद नाकारले गेल्याने फडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नसल्याचे सांगून त्याबाबत स्वतः पत्रकार परिषदेत घोषणा करण्याचे टाळले असावे. त्यामुळेच मोदी-शहा यांच्या वतीने नड्डा यांना फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे जाहीर आवाहन करावे लागल्याची भाजप वर्तुळात चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button