देवेंद्र फडणवीसांची शिंदेंसोबत आधीच झाली होती बोलणी; सरकार अस्थिर करणाऱ्या बंडाची INSIDE STORY
![Devendra Fadnavis had already held talks with Shinde; INSIDE STORY OF GOVERNMENT DESTRUCTION](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Devendra-Fadnavis-had-already-held-talks-with-Shinde-INSIDE-STORY-OF-GOVERNMENT-DESTRUCTION.jpg)
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली ही सर्व योजना आखल्याचे खात्रीलाकरित्या समजते. शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट झाले असते, तर भाजपवर आरोपांची राळ उठवली गेली असती. त्यामुळे पक्षांतरबंदीसाठी आवश्यक असलेला आकडा गाठेपर्यंत याविषयी वाच्यता करायची नाही, अशी रणनीती ठरवली गेली.
केंद्रातील भाजप पक्ष सत्तेचा, पैशांचा तसेच केंद्रीय यंत्रणेच्या जिवावर इतर राज्यांतील विरोधी सरकारे पाडतात अशाप्रकारचा आरोप देशभरातून पक्षावर होत होता. यापूर्वीही अशाप्रकारचे सरकार फोडाफोडीचे पाऊल उचलले गेल्यानंतर भाजपचे विरोधक त्यांच्यावर आरोपांच्या तोफा डागायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारला धक्का देण्यासाठी शिवसेनेमध्ये फूट पाडण्याची रणनीती रचली गेली, तेव्हा जाणीवपूर्वक यातून भाजपचा सहभाग कुठेही दिसणार नाही याची दक्षता बाळगण्यात आली. या बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते, तो याच रणनीतीचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. आम्ही सरकार पाडले नसून, शिवसेनेतच बंडाळी माजल्याचे भाजपला दाखवायचे होते. मात्र आवश्यक असलेला आमदारांचा आकडा गुरुवारी टप्प्यात आल्याचे दिसताच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत बंडखोर आमदारांना भाजपचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून राज्यातील भाजपने त्यांच्यावर उडवल्या जाणाऱ्या आरोपांना सुरुवातीच्या काळात रोखण्यात यश मिळवल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्येचा दावा योग्य आहे का, तसेच पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ नये यासाठीचा ३७ आमदारांचा आकडा तयार होतो का याची चाचपणी करण्यात आली. गुरुवारी या आकड्यापर्यंत एकनाथ शिंदे पोहोचल्याचे दिसू लागल्याने भाजपचा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे समजते. गुरुवारी आकड्याच्या दिशेने बंडखोर पोहोचताच देवेंद्र फडणवीस पुढील बोलणी करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
आधीच शिंदेंसोबत बोलणी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व गोष्टी ठरल्यानंतर फडणवीस यांनी यासंदर्भात अमित शहा यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या बंडाला सुरुवात झाल्याचे कळते. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्याने हा प्रयोग फसला होते.