मुंबई विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते, सचिन सावंतांचा मोदींवर निशाणा
![Dandiya dance at Mumbai airport says a lot, Sachin Sawant targets Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/मुंबई-विमानतळावर-झालेलं-दांडीया-नृत्य-बरंच-काही-सांगून-जाते-सचिन-सावंतांचा-मोदींवर-निशाणा-.jpg)
मुंबई: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यावरून काँग्रेसन आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतला आहे. अदानींनी घेतलेल्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेसनं थेट मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी केलं जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालयं गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच आता ‘एएएचएल’चं मुख्यालय देखील गुजरातमध्ये गेल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असंच गुजरातला नेलं गेलं,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.