‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या बंडांची वातावरण निर्मिती?
![Creating an atmosphere of rebellion by Eknath Shinde through the film 'Dharmaveer'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Creating-an-atmosphere-of-rebellion-by-Eknath-Shinde-through-the-film-Dharmaveer-1.jpg)
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला असून नुकताच ‘ओटीटी’वरून घराघरामध्ये पोहोचला आहे. ठाण्यातील दिघे समर्थक शिवसैनिकांच्या व्यक्तिरेखा या चित्रपटामधून समोर आल्या आहेत. चित्रपटामध्ये दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यावर या चित्रपटाचा सर्वाधिक भर दिसून येतो. हा चित्रपट ठाण्यातील प्रत्येक नागरिकांना दाखवण्यासाठी या चित्रपटाचे मोफत शो शहरातील नगरसेवक आणि शिवसेना नेत्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित केले होते. शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत दुर्दैवी शोकांतिका या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर साकारण्यात आली आहे. त्यामुळे धर्मवीर या चित्रपटाच्या माध्यमातून या बंडाची वातावरण निर्मिती केल्याचेही बोलले जात आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे सर्वोच्च नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख असली तरी ही ओळख तयार करण्यामध्ये आनंद दिघे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टाकलेली जबाबदारी शिंदे यांनी स्वीकारून त्याला न्याय दिला. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना गुरूस्थानी मानतात. त्यांच्यामधील हे गुरूशिष्याचे नाते शिंदे यांनी सातत्याने बोलून दाखवले आहे. २०१९ मध्ये मंत्रिपदाच्या शपथविधीच्या प्रसंगीही शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने शपथ घेतली होती. काही महिन्यांपूर्वी धर्मवीर हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट प्रदर्शित झाला होता. शेकडो चित्रपटप्रेमींनी हा चित्रपट पाहिला आला. शिवसेनेकडून हा चित्रपट घराघरामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने या चित्रपटाचे विशेष शो आयोजित करण्यात आले होते. प्रभागातील प्रत्येकाला हा चित्रपट दाखवून त्यांना दिघे आणि शिंदे यांची कथा सांगण्यात आली. गेल्या आठवड्यामध्ये हा चित्रपट ओटीटीवरूनही प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचला. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे हा चित्रपटाच्या माध्यमातून ठाणे शहरात वातावरण निर्मिती केल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
चित्रपटांच्या संवादाचे स्टेटस
जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात माझ्याशी वैर नाही घ्यायचं…, अनाथांचा एकनाथ हो, दिन दुबळ्यांचा लोकनाथ हो…, कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी… अशा संवादांचा वापर करून अनेक शिंदे समर्थकांनी सोशल मीडियावर स्टेटस आणि पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटातील गाण्यांचाही आधार घेऊन शिंदे यांच्याबद्दलची सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.