Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

करोनाने टेन्शन वाढवले!, मुंबईत आढळले नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण

मुंबई | करोनासंसर्गासाठी कारणीभूत असलेल्या ओमायक्रॉन या उपप्रकाराने बाधित रुग्णांपैकी बीए.४चे तीन आणि बीए.५चा एक रुग्ण मुंबईमध्ये आढळला होता. हे सर्व रुग्ण घरगुती स्वरूपातील विलगीकरणात बरे झाले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉनच्या उपप्रकाराने बाधित रुग्णांमध्ये दोन ११ वर्षांच्या मुली, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. मागील १५ दिवसांमध्ये त्यांनी बाहेरच्या देशात किंवा राज्यात प्रवास केलेला नाही. कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेने जाहीर केलेल्या करोना जनुकीय सूत्रनिर्धारणांतर्गत बाराव्या फेरीतील चाचणीच्या निष्कर्षांत हे दिसून आले आहे. बीए.४च्या तीन रुग्णांपैकी ११ वर्षांच्या मुली लसीकरणाच्या वयोगटात मोडत नाहीत आणि उर्वरित एका रुग्णाला अॅलर्जी असल्याने त्यानेदेखील लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. तर, बीए.५ने बाधित रुग्णाने लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

या १२व्या फेरीत २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०२ नमुने पालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने पालिका क्षेत्राबाहेरील होते. पालिका क्षेत्रातील २०२ नमुन्यांपैकी ९९.५ टक्के अर्थात २०१ नमुने ओमायक्रॉन या उपप्रकाराने बाधित होते, तर एक नमुना डेल्टा या उपप्रकाराने बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

२०२ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण

रुग्णसंख्या (टक्के) वयोगट (वर्षे)

२४ (१२) ०० ते २०

८८ (४४) २१ ते ४०

५२ (२६) ४१ ते ६०

३२ (१६) ६१ ते ८०

०५ (०२) ८१ ते १००

लसीकरणानुसार विश्लेषण

चाचणी करण्यात आलेल्या मुंबईतील २०२ रुग्णांपैकी दोन रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १२९ रुग्णांपैकी नऊ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ७१ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी नऊ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर दोन रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

पालिकेकडून आवाहन

विविध उपप्रकारांतील करोना विषाणूची होणारी लागण लक्षात घेता ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button