Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपाल कोश्यारींना दिला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे” अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली.

“राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये” असंही देशपांडेंनी सुनावलं. मनसे आणि भाजपची गेल्या काही काळात जवळीक वाढत असल्याने या मुद्द्यावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधणार का? असा प्रश्न विचारला असता, राज्यपाल हे काही भाजपचे नाहीत, ते न्यूट्रल असतात, त्यामुळे त्यांनाच आम्ही सांगू, असंही स्पष्टीकरण देशपांडेंनी दिलं.

राज्यपाल काय म्हणाले होते?

कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

काँग्रेसचा आक्षेप

राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, अशी भूमिका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे. सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button