मंदिराच्या आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता; विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खूष
पंढरपूर: मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आराखड्याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या आराखड्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खूष आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन आहे. या मंदिराला मूळ स्वरूप देण्यासाठी मंदिर समिती व पुरातत्व विभागाने एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार काम करण्यासाठी जवळपास ५५ ते ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात आज मंदिर समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याने नजीकच्या काळात विठ्ठल मंदिराच्या आराखड्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला चंद्रभागा नदीच्या तिरावर भक्तांचा महापूर येत असतो. त्यामुळे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती निशुल्क सेवा याठिकाणी देते. मात्र, यावर्षी चंद्रभागा नदीच्या पात्रात पुराचे पाणी असले तरी कोरोनामुळे भक्तांचा पूर आटला आहे. चंद्रभागा स्नानासाठी तिरावर वारकरीच नाहीत. दरवर्षी मैलांचा प्रवास करुन वारकरी येथे स्नानासाठी येत असतात. पण, यंदा कोरोनामुळे त्याची परवानगी नाही. त्यामुळे चंद्रभागेचा काठ यावर्षी सुनासुना दिसतोय.