परभणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, भाजप महिला आमदार चिखल तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर
![Cloudburst-like rain in Parbhani, BJP women MLA trampling mud on farmer's embankment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Cloudburst-like-rain-in-Parbhani-BJP-women-MLA-trampling-mud-on-farmers-embankment.jpg)
परभणी: परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी भाजपाच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर या शेतकऱ्यांसाठी धावून आल्या. त्यांनी चिखल तुडवत जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे आज पाहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदारही होते. यावेळी त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे आडगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
नुकसानीची माहिती मिळताच भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी नायब तहसीलदार परेश चौधरी यांच्यासह आडगाव येथे चिखल तुडवत जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे.
शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी साचले असल्यामुळे शेतकऱ्याचे पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आता आमदारासह नायब तहसीलदार यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा लागली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
परभणीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह जिल्ह्यात रविवारी (७ ऑगस्ट) दुपारपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी (८ ऑगस्ट) पहाटेपासून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १५ मी मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून, कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. परभणी १३.३ (२६.२), गंगाखेड ३.६ (४०.३), पाथरी २४.४ (३८.१), जिंतूर २४.८ (३९.२), पूर्णा ८.७ (४३.५), पालम १५.४ (४१.१), सेलू १९.२ (३४.१), सोनपेठ ६.८ (३७.६), आणि मानवत १५.२ (२८.१) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१.३ मि.मी. असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ४८६ मिमी पाऊस झाला आहे.