महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजप आमदारांचे मंत्रीपदासाठी लॉबिंग; ‘ही’ नावे आघाडीवर
![BJP MLAs lobbying for ministerial posts after the collapse of the Mahavikas Aghadi government; 'These' names are at the forefront](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/BJP-MLAs-lobbying-for-ministerial-posts-after-the-collapse-of-the-Mahavikas-Aghadi-government-These-names-are-at-the-forefront.jpg)
पुणेः महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचा सहभाग निश्चित असल्याने पुण्यातील भाजपच्या आमदारांनी मंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित असून, आणखी एखादे मंत्रीपद पुण्याला मिळू शकते, अशी चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांची आगामी मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याचा विचार केला, तर आमदार राहुल कुल किंवा महेश लांडगे यांच्यापैकी एकाला संधी देण्याचा विचार होऊ शकतो, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. येत्या शनिवारी (१ जुलै) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पुण्यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि कॅन्टोन्मेंटचे आमदार कांबळे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मिसाळ या पक्षातील ज्येष्ठ आमदार आहेत. त्या तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार मंत्रीपदासाठी प्रामुख्याने होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया भाजपमधील उच्चपदस्थांनी व्यक्त केली.
मंत्रीमंडळात मातंग समाजाला प्रतिनिधित्व देताना सुनील कांबळे किंवा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या पर्याय आहे. यामध्ये कांबळे हे सातपुते यांच्यापेक्षा पक्षात वरिष्ठ असून, संघटनेत त्यांच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे कांबळे यांना प्राधान्य मिळेल, अशी चर्चा आहे. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार रणजित मोहिते-पाटील यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागली तर माळशिरसलाही प्रतिनिधित्व मिळेल, अशीही चर्चा आहे. फडणवीस सरकारच्या शिल्पकारांमध्ये पाटील हे आघाडीवर होते. पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटील हे मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील. त्यामुळे पुण्याला पाटील यांच्याशिवाय इतर मराठा आमदारांना मंत्रीमंडळात फारसे स्थान मिळेल, अशी शक्यता कमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.