भोसरी- आदिनाथनगर येथे कचरा समस्या मार्गी लावण्यासाठी नगरसेविका सोनाली गव्हाणे यांचा पाठपुरावा
![Bhosari- Corporator Sonali Gavhane's pursuit to solve the waste problem at Adinathnagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/0sonali_gavhane_pimpari_final-1.jpg)
- महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी- आदिनाथनगर येथील उद्यानाशेजारीच कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकवेळा तक्रार करूनही महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महापालिका आरोग्य विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी शहर सुधारणा समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ७ येथे महापालिकेचे कै. वामनराव गव्हाणे उद्यान आहे. या उद्यानासमोरील भिंतीशेजारी परिसरातील नागरिक तसेच उद्यानात काम करणारे कर्मचारी कचरा टाकतात. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उद्यान परिसरातील साफसफाई नियमितपणे केली जात नाही, असे निदर्शनास आले आहे. उद्यानाशेजारी पडलेला कचरा वेळेवर उचलला जात नाही. दोन-तीन दिवस हा कचरा या ठिकाणी पडलेला असतो. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही कचरा उचलला जात नाही, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.
आदिनाथनगर येथील कै. वामनराव गव्हाणे पाटील उद्यानाचे नूतनीकरण सुरू आहे. या ठिकाणी काम करीत असलेले कर्मचारी गोळा झालेला राडारोडा उद्यानच्या बाहेर फेकतात. तसेच, उद्यानात येणारे नागरिकदेखील कचरा टाकतात. परिणामी या ठिकाणी कायमच कचरा व घाण साचते. परिसरातील नागरिक या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न फेकून देतात. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगत राडारोडा पडून असल्याने पादचाऱ्यांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकणी उद्यान असल्याने खेळण्याकरिता येणाऱ्या लहान मुले आणि फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दुर्गंधी तसेच राडारोड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच, यामुळे साथीच्या आजारांची शक्यता नाकारता येत नाही. नागरी आरोग्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असलेली ही कचरा समस्या तात्काळ मार्गी लावावी, असेही प्रा. सोनाली गव्हाणे यांनी म्हटले आहे.