विदेशतील विविध विद्यापीठांमध्ये नोकरीस लावून देण्याचे आमिष देत १० लाख ८७ हजार ४८८ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली
![An incident of fraud of Rs 10 lakh 87 thousand 488 has come to light by giving the lure of employment in various universities abroad.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/An-incident-of-fraud-of-Rs-10-lakh-87-thousand-488-has-come-to-light-by-giving-the-lure-of-employment-in-various-universities-abroad..jpg)
जळगाव : शहरातील एम. जे. कॉलेज परिसरातील प्राध्यापकाला विदेशतील विविध विद्यापीठांमध्ये नोकरीस लावून देण्याचे आमिष देत १० लाख ८७ हजार ४८८ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांतीलाल पितांबर राणे हे हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. १४ सप्टेंबर २०२१ ला त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्हाला अप्लाय करायचा आहे का? अशी विचारणा समोरच्या व्यक्तीने केली. राणे यांना देखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. यानंतर राणे यांच्या प्रतिसादानंतर त्यांना वेळोवेळी अनेक मोबाइल क्रमांकावरून फोन येऊ लागले. यात शिल्पा आणि आर. एम, करणसिंग असे नाव सांगून त्यांच्याशी संवाद सुरू होता.
सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने या अनोळखी व्यक्तींनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने २९ जुलै २०२२ पर्यंत वेळोवेळी तब्बल १० लाख ८७ हजार ४८८ रुपये घेतले. यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागितले. यानंतर अनोळखी व्यक्तींनी प्रतिसाद देणं बंद केलं. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.