breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजना

प्रशासक व आयुक्त शेखर सिंह यांची घोषणा : मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी। महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी।

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची प्रशासनान दक्षता घ्यावी. तसेच गणेश मंडळांना महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून देण्यात येणा-या विविध परवानग्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेली एक खिडकी योजना सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवा, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

दि.३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणा-या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांची संयुक्त बैठक महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ,उल्हास जगताप, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या महापालिका, पोलीस प्रशासन आदी यंत्रणांकडील विविध परवानग्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ही सुविधा शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येईल. परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र शासन, महापालिका तसेच इतर यंत्रणांनी निश्चित केलेल्या अटी शर्तींचे पालन करणे संबंधित मंडळाला बंधनकारक असणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट सुव्यवस्थित ठेवा…
महापालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीचे मार्ग तसेच सर्व विसर्जन घाट सुव्यवस्थित करावे. तसेच त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करावी. धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील होणारी पाण्याची वाढ लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. नदी घाटावर असणा-या कृत्रिम विसर्जन हौदांची डागडुजी करून आवश्यकतेप्रमाणे इतर ठिकाणी नव्याने कृत्रिम हौद तयार करावे. क्षेत्रीय अधिका-यांनी प्रभागस्तरावर सार्वजनिक गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, अशासकिय संस्था, पर्यावरणवादी संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करावे, आदी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी विसर्जन स्थळांची पाहणी करून विसर्जन घाट निश्चित करावेत, या ठिकाणांची यादी नागरिकांसाठी प्रसिध्द करावी. कंट्रोल रूम तयार करून त्याद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button