निसर्गाचा चमत्कार! घरातच लागला पाण्याचा झरा; चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार समोर
![A miracle of nature! A spring of water started in the house; In a village in Chandrapur district, this type of situation is encountered](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/A-miracle-of-nature-A-spring-of-water-started-in-the-house-In-a-village-in-Chandrapur-district-this-type-of-situation-is-encountered.jpg)
चंद्रपूरः सततच्या पावसामुळं रस्त्यांवर व शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळं आता चक्क नागरिकांच्या घरातच पाण्याचे झरे लागले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार समोर आला आहे. घरातच झरे लागल्याने कुटुंबियांची चांगलीच तारांबळ उडाली होती. बाहेर पाऊस आणि घरात पाण्याचे झरे यामुळं संपूर्ण रात्र या कुटुंबाने जागून काढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर या गावात हा अजब प्रकार घडला आहे. शांताराम राऊत यांच्या घरातून अचानक पाण्याचे झरे वाहू लागले आहेत. अचानक पाण्याचे झरे वाहू लागल्याने या कुटुंबाची पुरती झोपमोड झाली. रात्रभर हे कुटुंब पाण्याचा उपसा करत होते.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सूरू आहे. पावसामुळं शेती कामांना ब्रेक लागला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. इरई नदीचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाने दाणादाण उडविली असतांना या पावसामुळेच एका कुटूंबाची झोप उडाली आहे. पावसानं थेट घरात शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या घरातील स्वयंपाक खोलीत पाण्याचे झरे लागले आहेत. संपुर्ण घरात पाणी पाझरू लागले आहे. घराचा सभोवताली पाणीच पाणी साचलं आहे. त्यामुळे घरात झरे लागले आहेत. तर, घरात फर्शी नसून साधी जमिन आहे. त्यामुळं झरे पाझरु लागले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.