TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाच्या फोनवरील संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: पावसाळी अधिवेशनात सामान्य जनतेचे प्रश्न सोडून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नुकताच झालेला राडा हा टीकेचा विषय ठरला होता. या सगळ्या राजकारणापलीकडे प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती किती बिकट आहे, हे दाखवणारा एक प्रसंग समोर आला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाच्या फोनवरील संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये संबंधित शिक्षकाने प्रशांत बंब यांचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. प्रशांत बंब यांनी संबंधित शिक्षकाने उपस्थित केलेल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर विचार करण्याऐवजी त्या शिक्षकालाच फटकारले. यावर संतप्त शिक्षकाने प्रशांत बंब यांनाही चांगलेच सुनावले. एक आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने प्रशांत बंब यांचा पाणउतारा केला. ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या संभाषणाच्या सुरुवातीला शिक्षकाने आमदार प्रशांत बंब यांच्याकडे शालेय शिक्षणाच्या दुरावस्थेत बाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रशांत बंब यांनी मी अधिवेशनात याविषयीचे प्रश्न मांडल्याचे सांगितले. परंतु, संबंधित शिक्षक बंब यांच्या उत्तराने समाधानी नव्हता. तेव्हा बंब यांनी म्हटले की, तुम्ही मी काय बोलायचं हे सांगू नका, मी बरोबर बोलतोय की चूक एवढचं सांगा. त्यानंतर या शिक्षकाने बंब यांच्या कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्थेबाबत बोलायला सुरुवात केली. तुमच्या तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नाहीत, पत्रे उडाले आहेत. तुमचं या शाळांकडे लक्ष आहे का? तुम्ही सरकारी कायद्याबाबत इतकं बोलता, पण तुमच्या भागातील शाळांची तरी तुम्हाला काळजी आहे का, असा प्रश्न या शिक्षकाने विचारला. त्यावर प्रशांत बंब हे चांगलेच संतापले.

यानंतर प्रशांत बंब यांनी संबंधित शिक्षकाला चांगलेच सुनावले. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नसतील, मुलं उघड्यावर बसत असतील तर शिक्षकांना लाज वाटत नाही का, असे प्रशांत बंब यांनी म्हटले. त्यावर शिक्षकाने क्षणाचाही विलंब न लावता,’आमदार म्हणून तुम्हालाही लाज वाटली पाहिजे ना थोडी’, असे म्हटले. आम्ही शिक्षक किती अडचणीत मुलांना शिकवतो हे तुम्हाला माहिती आहे का, असे शिक्षकाने पुढे म्हटले. त्यावर प्रशांत बंब हे पुन्हा उसळले. तुम्ही शिक्षक एवढे चांगले असतात तर तुम्ही स्वत:च्या मुलांना स्वत:च्याच शाळेत शिकवले असते. त्यावर शिक्षकाने मी माझ्या मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवल्याचे सांगितले. त्यावर प्रशांत बंब म्हणाले की, ‘तुमच्या एकट्याची असेल म्हणून काय झालं, मुर्खासारखं बोलू नका’. त्यानंतर या शिक्षकाने बंब यांना तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात, असा प्रश्न विचारला. त्यावर बंब यांनी, ‘अरे तुमच्यामुळेच आम्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवत नाही. कारण तुम्ही बरोबर शिकवत नाही’, अशी टिप्पणी केली. तेव्हा शिक्षकाने आम्ही बरोबर शिकवतो, पण शासन आम्हाला काम करू देत नाही, असे म्हटले. तेव्हा बंब यांनी संबंधित शिक्षकाला निर्लज्ज म्हटले. या संवादाची ऑडिओ क्लीप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button